*अक्राणी ता. प्रतिनिधी, वसंत पावरा* :-
राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम (२०२७) करणा-या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये सरकारी अपघात विमा मिळावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थ मंत्री निर्मला सितारामन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले असून हे निवेदन ईमेल द्वारेही सुशिलकुमार पावरा यांनी पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,भारताचा राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम हा देशातील सर्वात मोठा प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रम आहे. जनगणना २०२७ ही भारताची १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी डिजिटल जनगणना आहे.ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक , केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, विविध विभागांतील अधिकारी ,ग्रामविकास अधिकारी,तलाठी, मुख्याध्यापक इत्यादी सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून देशात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान घरोघरी जाऊन घरांची मोजणी कर्मचारी करत आहेत.महाराष्ट्रात हे काम १६ मे ते १४ जून या कालावधीत सुरू राहणार आहे.दुस-या टप्प्यात फेब्रुवारी महिन्यात थेट लोकसंख्या आणि त्यांची सामाजिक-आर्थिक माहिती संकलित केली जाणार आहे.देशातील शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कल्याणकारी योजनांचे योग्य नियोजन करण्यासाठी जनगणनेची आकडेवारी पाया मानली जाते.
जनगणनेच्या आकडेवारीवरूनच देशातील विविध क्षेत्रांसाठी आणि राज्यांसाठी निधीचे वाटप केले जाते.मतदारसंघांची पुनर्रचना आणि राजकीय प्रतिनिधित्व जनगणनेवरच अवलंबून असते. जनगणना हा देशाच्या विकासाचा मुख्य पाया असल्याने नागरिकांनी या प्रक्रियेत अचूक माहिती देऊन सहकार्य करणे बंधनकारक आणि अत्यंत महत्त्वाचे आहे.जनगणनेचे हे राष्ट्रीय काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांचे अपघात होत असून काही कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. म्हणून जणगणना करणा-या कर्मचाऱ्यांना सरकारी अपघात विमा (Goverment Personal Accident Insurance) असणे अत्यावश्यक आहे. जी अपघातामुळे मृत्यू, कायमचे किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास आर्थिक मदत प्रदान करेल. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि उपचाराच्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला आर्थिक नुकसान भरपाई मिळेल किंवा अपघातात कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास किंवा कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व आल्यास हॉस्पिटलचा खर्च अपघात विम्यातून कव्हर करण्यास मदत होईल.अपघाती मृत्यू किंवा अपघाताच्या वेळी होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून कर्मचाऱ्यांला किंवा कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा सरकारी अपघाती विमा अतिशय महत्त्वाचा ठरेल.म्हणून राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम करणा-या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये सरकारी अपघात विमा मिळावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून सरकारकडे करण्यात आली आहे.

0 Comments