Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळखुटा रस्त्यावरील पुलांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका



बिरसा फायटर्सची मागणी-तहसीलदार अक्कलकुवा व कार्यकारी अभियंता यांना निवेदन

*अक्राणी प्रतिनिधी: वसंत पावरा.* 

अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा फाटा ते पिंपळखुटा मोठा तोलवापाडा पर्यंतचा ४ किलोमीटरच्या रस्त्यावरील पुलांचे निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका व पुलांचे  टिकाऊ व चांगले काम करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार अक्कलकुवा व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावे, मंगल वसावे व बांधकाम विभाग शहादा येथे बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, कार्याध्यक्ष बिरबल पावरा, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे , नंदुरबार जिल्हा अध्यक्ष हिरामण खर्डे, उपाध्यक्ष करन सुळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

                             निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा (५०५४) मार्ग व पूल (४) जिल्हा व इतर मार्ग या योजनेंतर्गत तोलवापाडा पिंपळखुटा काकडतीपाडा रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.ठेकेदार इंजि. प्रियंका जगदेवप्रसाद परदेशी वाण्याविहीर ता.अक्कलकुवा जि. नंदुरबार यांना देण्यात आले आहे. तरी अद्याप रस्त्याचे काम सुरुवात करण्यात आली नाही. डोंगरद-यातून व घाटातून पायीच पिंपळखुटा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या ५ वर्षांत गर्भवती महिलांसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ रस्त्या अभावी वेळेवर उपचार मिळू न शकल्याने अनेक रूग्ण दगावले आहेत, रूग्ण दगावत आहेत.त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

                        रस्त्याअभावी अनेक रूग्णांचे हाल होत असून रूग्ण दगावत आहेत. या रस्त्यावरील पुलाच्या कामांची बिरसा फायटर्स टिमने प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता रस्त्यावरील पुलांचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून पुल बांधण्यासाठी रेतीऐवजी माती,खडीऐवजी दगड, कमी सिमेंट व लोखंड न वापरता पुलांचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदार यांनी केले आहे.त्यामुळे पुलाच्या बांधकामाला अनेक ठिकाणी तळे पडले आहेत.पूलाचे काम  धोकादायक झाले असून पूल केव्हाही कोसळू शकतो ,अशी स्थिती आहे.

Post a Comment

0 Comments