आ. मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या जागेवरच निकाली; १३ प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी
शेवगाव / प्रतिनिधी (लक्ष्मण मडके ):-
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर” अभियानांतर्गत आज दिनांक १० रोजी मौजे घोटण येथे कालिका माता मंदिर परिसरात भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अनेक प्रलंबित प्रश्न जागेवरच निकाली काढण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी शैलेश शिंदे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोनिकाताई राजळे उपस्थित होत्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, बापूसाहेब भोसले, भाजप तालुका अध्यक्ष संजय टाकळकर, गटविकास अधिकारी शहा मॅडम, घोटण चे तलाठी अमोल हिंगे,मंडळाधिकारी श्री.सुनील लवांडे रावसाहेब, तसेच एरंडगाव मंडळातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, मंडळ अधिकारी व तलाठी आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरिकांना सातबारा व आठ उताऱ्यांतील चुकांची दुरुस्ती, डिजिटल उतारे, ॲग्रीस्टॅग नोंदणी, किसान नोंदणी, उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जातीचा दाखला तसेच शासनाच्या विविध विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
शिबिरांमध्ये नागरिकांना सातबारा उतारा, फेरफार नोंद, वारस दाखला, जमीन मोजणी, तक्रार निवारण, शासन योजनांची माहिती यांसारख्या तब्बल १३ प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार आकाश दहाडदे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना कार्यालयाचे वारंवार फेरे मारण्याची गरज उरणार नसून, वेळ व खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेतकरी व नागरिकांना या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यभर अशा शिबिरांचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार आकाश दहाडदे यांनी केले, सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी तर आभार प्रदर्शन सजेचे तलाठी अमोल हिंगे यांनी केले

0 Comments