यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- : यवतमाळ बायपास येथे तैनात असलेल्या ट्राफिक पोलीस बांधवांच्या सतर्कतेमुळे आणि नंददीप फाउंडेशनच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे एका बेघर, निराधार आणि अत्यंत दयनीय अवस्थेतील मनोरुग्णाला नवजीवन मिळाले आहे.
ट्राफिक पोलीस रवींद्र चव्हाण, अमोल शेंडे, गणेश मेश्रे, प्रमोद मडावी, उमेश शिंदे, दिनेश निंबर्ते, नरेंद्र आडे आणि संजय मडावी यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या या व्यक्तीची गंभीर अवस्था ओळखून तत्काळ नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच फाउंडेशनचे बबन घोडेस्वार आणि भोजराज गजबे यांनी घटनास्थळी धाव घेत त्या मनोरुग्णाला सुरक्षितपणे प्रकल्पावर आणले.
प्राथमिक तपासणीदरम्यान त्याच्या दोन्ही कानामध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. डॉक्टर प्रवीण राखुंडे आणि डॉक्टर रेश्मा कंकाळ यांनी अत्यंत दक्षतेने त्याच्या कानातील माती काढून प्रथमोपचार केले. त्यानंतर त्याचे केस कर्तन करून स्वच्छ आंघोळ घालण्यात आली आणि नवीन कपडे देऊन त्याला सन्मानाने उभे केले गेले.यानंतर मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांनी औषधोपचार सुरू केले. नियमित उपचार आणि सेवेमुळे अवघ्या एका महिन्यात त्याची प्रकृती लक्षणीय सुधारली आणि तो स्वतःची ओळख सांगू लागला.
त्याचे नाव मल्लेश असून तो गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील रेगुंटा (मजूर पल्ली) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या कुटुंबात आई-वडील, दोन भाऊ – मुकेश व राजा – तसेच दोन विवाहित बहिणी आहेत. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या मल्लेशच्या आयुष्यात एका अपघातानंतर मोठे वळण आले. अपघातानंतर झालेल्या मारहाणीमुळे त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली व ऐकण्याची क्षमता कमी झाली. योग्य वेळी उपचार न झाल्याने त्याची मानसिक स्थिती बिघडत गेली आणि तो घरापासून दूर भटकत राहिला.सातवीपर्यंत शिक्षण घेतलेला मल्लेश आज पुन्हा सामान्य आयुष्याकडे परतण्याच्या मार्गावर आहे. नक्षलग्रस्त, अतिदुर्गम भागातील त्याच्या मूळ गावी ३ एप्रिल २०२६ रोजी त्याचे पुनर्वसन करण्यात आले.
या पुनर्वसन प्रक्रियेत नंददीप फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनीही मोलाची भूमिका बजावली. निशांत सायरे, कार्तिक भेंडे, स्वप्निल सावळे, कृष्णा मुळे, अक्षय बानोरे आणि विकी एकोणकार यांनी अथक परिश्रम घेत मल्लेशला सुरक्षितपणे त्याच्या गावी, कुटुंबीयांच्या स्वाधीन करून खऱ्या अर्थाने “घरपोच पुनर्वसन” साकारले.
या पुनर्वसन सोहळ्यास दि अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, यवतमाळचे अध्यक्ष माननीय नितीनजी खर्चे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधरजी कोरे, राजेंद्रजी खोतकर, डॉक्टर सुशील बत्तलवार, भगवान भितकर यांच्यासह नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे, नंदिनी शिंदे, निशांत सारे, पल्लवी गिराम, गौरी सायरी बोटरे, सविता मडावी, प्रिया बागडे, निकिता डेरे, जोशना आत्राम, बबन घोडेस्वार आणि भोजराज गजबे उपस्थित होते.या संपूर्ण पुनर्वसन सोहळ्याचा खर्च दि अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, यवतमाळ यांनी उचलून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
नंददीप फाउंडेशनचे संस्थापक संदीप शिंदे आणि नंदिनी शिंदे हे दाम्पत्य २४ तास सेवाभावाने कार्य करत असून त्यांच्या अथक परिश्रमांचे हे यशस्वी फळ आहे. त्यांच्या समर्पित कार्यामुळे आज नंददीप फाउंडेशनची सेवा घराघरापर्यंत पोहोचत आहे आणि सर्व स्तरांतून या कार्याचे कौतुक व आभार व्यक्त केले जात आहेत.नंददीप फाउंडेशनच्या या सेवाकार्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले की,“माणुसकीची खरी ताकद म्हणजे हरवलेल्या आयुष्याला नव्याने उभे करण्याची शक्ती.”

0 Comments