Ticker

6/recent/ticker-posts

हातकणंगले तालुक्यात गॅसचा तीव्र तुटवडा; पुरवठा अपुरा, नागरिक त्रस्त




हातकणंगले (प्रतिनिधी – सचिन सुतार) :

आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून हातकणंगले तालुक्यात घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे गॅस पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत.

तालुक्यातील अनेक भागांत गॅस सिलिंडर केवळ २५ ते ३० दिवसांत संपत असताना नवीन सिलिंडरसाठी तब्बल ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. ओटीपी प्रक्रिया उशिरा होत असल्याने गृहिणींना घरातील स्वयंपाकाचे नियोजन करणे कठीण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सदस्यसंख्या अधिक असल्याने गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी, सिलिंडर लवकर संपतो आणि नव्या सिलिंडरसाठी नागरिकांना दोन-दोन दिवस रांगेत उभे राहावे लागत असल्याची परिस्थिती आहे.

यासोबतच गॅस पुरवठा कार्यालयांमधील अनियमिततेबाबतही नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही कुटुंबांनी ६० ते ९० दिवस सिलिंडर घेतले नसतानाही त्यांच्या नावावर सिलिंडर वितरित झाल्याचे दाखवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित सिलिंडर नेमके कुठे जात आहेत, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुरवठा व्यवस्थेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

आलिशान घरांवर चुलीचा धूर :

गॅस अभावी अनेक नागरिकांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. कोट्यवधी खर्च करून आधुनिक घरे उभारलेल्या कुटुंबांनाही टेरेसवर चुली पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. धूर व गैरसोयी टाळण्यासाठी बंद केलेली चुलीची पद्धत पुन्हा सुरू करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

पुरवठा कमी, मागणी अधिक :

सध्या तालुक्यातील एका गावामध्ये सुमारे ७०० ते ८०० ओटीपी प्रलंबित असून, गॅस सिलिंडरचा पुरवठा केवळ ३०० नगांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत असून तुटवडा अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा गॅसचा अतिरिक्त पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.एकूणच, वाढत्या गॅस तुटवड्यामुळे सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments