प्रतिनिधी महागांव दीपक तायवाडे
महागांव शहरातील नागरिकांना मागील दीड वर्षांपासून मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन बंद असल्यामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. अनेकदा पाठपुरावा करूनही प्रश्न प्रलंबितच राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. अखेर नगरपंचायतीच्या माध्यमातून या मेन पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी पाणीपुरवठा सभापती सुरेश पाटील नरवाडे यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन केली. कामाचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकारी व कामगारांना दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना दीर्घकाळ पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने प्राधान्याने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दीर्घकाळ बंद असलेल्या मुख्य पाईपलाईनमुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
आता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने लवकरच पाणीपुरवठा नियमित होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यातही सुरेश पाटील नरवाडे सक्रिय असल्याचे दिसून येते. अनेक गरजू नागरिकांना घरकुल योजनेचे पैसे मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तसेच अपंग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही त्यांनी मदत केली असल्याचे सांगितले जाते.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानातही त्यांनी पुढाकार घेत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनजागृती करण्याचे काम केले. शहरातील विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश पाटील नरवाडे हे भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहिले असून महागावमध्ये पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळताना संघटन मजबूत करण्याचे काम केले असल्याचे कार्यकर्ते सांगतात.
नगरपंचायतीत माजी उपनगराध्यक्ष म्हणून काम केल्याचा अनुभवही त्यांना असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजाची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे आगामी महागाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

0 Comments