Ticker

6/recent/ticker-posts

पात्र उमेदवारांना न्याय द्या, अंगणवाडी भरती पारदर्शक करा – जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

 



प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे 

महागांव : तालुक्यात सुरू असलेल्या अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेबाबत पारदर्शकता राखण्यात यावी तसेच कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार होऊ नयेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.या भरती प्रक्रियेबाबत काही ठिकाणी गैरप्रकारांच्या चर्चांना उधाण आल्याने पात्र उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

महिला व बाल विकास विभागामार्फत तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्य, पोषण आणि संगोपनाशी थेट संबंध असलेले हे पद असल्याने या भरती प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

 मात्र काही ठिकाणी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जात नसल्याच्या तसेच आर्थिक व्यवहार करून नियुक्त्या मिळत असल्याच्या चर्चा परिसरात रंगू लागल्याने उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.अंगणवाडी मदतनीस पद हे केवळ एक नोकरी नसून महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी असलेले पद आहे.

 त्यामुळे या पदासाठी पात्रता, गुणवत्ता आणि शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसारच उमेदवारांची निवड होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र भरती प्रक्रियेत गुणांकन कसे दिले जाते, कागदपत्रांची पडताळणी कशी होते आणि अंतिम निवड कोणत्या निकषांवर केली जाते, याबाबत स्पष्टता नसल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा पारदर्शक ठेवण्यात यावा, गुणांकन व निवड प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करण्यात यावी तसेच गैरप्रकारांच्या चर्चांबाबत चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी सय्यद मुदस्सीर यांनी निवेदनातून केली आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक महिला या भरती प्रक्रियेची वाट पाहत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणे हेच उमेदवारांचा विश्वास टिकविण्याचे खरे उत्तर ठरणार असल्याची चर्चा महागांव परिसरात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments