प्रतिनिधी महागांव दीपक तायवाडे
महागांव नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मुस्लीम वसाहतीतील सामाजिक सभागृह व त्यालगतची खुली ओपनस्पेसची जागा मौलाना अबुल कलाम आझाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्याकडे हस्तांतरित करण्याबाबत हालचाली सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेवक मो. परवेज मो. शफी सुरैया यांनी नगरपंचायत अध्यक्षा यांना निवेदन देत सदर प्रक्रियेला गती देण्याची विनंती केली आहे.
नगरसेवक सुरैया यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत दिनांक १४ मार्च २०२२ रोजी ठराव क्रमांक ३२ नुसार मुस्लीम वसाहतीतील सामाजिक सभागृह व त्यालगतची नगरपंचायतीची खुली ओपनस्पेसची जागा मौलाना अबुल कलाम आझाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था (नोंदणी क्र. ७५४/२०१५) यांना देखरेख, सौंदर्यीकरण तसेच वापरासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास संबंधित ठिकाणाची देखभाल, परिसराचे सौंदर्यीकरण तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर प्रक्रियेला लवकरात लवकर गती मिळावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुस्लीम वसाहतीतील सामाजिक सभागृह व परिसराचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग व्हावा तसेच समाजोपयोगी उपक्रमांसाठी ही जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संस्थेकडे हस्तांतरणाचा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या संदर्भात नगरपंचायतीकडे निवेदन देताना टिपू सय्यद, परवेज सुरैया, शेख मन्नान शेख युसुफ, फिरोज पठाण, अल्लाउद्दीन बागबान, अलीम पठाण, अजिस पठाण, शेख नूर शेख हैदर, शेख सद्दाम अकबर आदी उपस्थित होते.
या निर्णयामुळे भविष्यात त्या परिसरात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 Comments