प्रतिनिधी महागांव दीपक तायवाडे
महागांव : सवना, वाकोडी व वेणी शिवारात मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असताना पिकांना पाण्याची तीव्र गरज भासत आहे आणि अशा वेळी वीज पुरवठ्याचा सुरू असलेला लपंडाव शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. दर तासाला खंडित होणाऱ्या वीजेमुळे विहीर व बोअरवेलच्या मोटारी बंद पडत असून ऊस पिके अक्षरशः तहानलेली राहात आहेत. परिणामी परिसरातील बागायतदार शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत.
ऊस हे पाण्यावर अवलंबून असलेले प्रमुख नगदी पीक मानले जाते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर, बोअरवेल तसेच कॅनालच्या माध्यमातून पाणी उपसा करून सिंचन करावे लागते. मात्र यासाठी अखंडित वीज पुरवठा आवश्यक असताना सध्या केंद्रांवर ओव्हरलोड निर्माण होत असल्याने वीज वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व नियोजन कोलमडले असून पिकांवर पाण्याचा गंभीर ताण निर्माण झाला आहे.
सवना शिवारातील काही भाग गुंज येथील वीज केंद्राशी जोडण्यात आला आहे. मात्र तेथील परिस्थितीही तितकीच बिकट असल्याने वीज पुरवठा सुरळीत मिळत नाही. परिणामी सवना, वाकोडी आणि वेणी परिसरातील शेकडो एकर ऊस पिकावर संकटाचे ढग दाटले आहेत. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असताना पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी गोविंदराव देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता गुंज ते सवना दरम्यानची लिंक लाईन तसेच बॅक कॅपेसिटरचे काम अद्याप अपूर्ण असल्याने सबस्टेशनवर प्रचंड ओव्हरलोड येत असल्याचे कारण पुढे आले आहे. मात्र या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असल्याने नाराजीचा सूर तीव्र होत आहे.
आधीच वाढलेले खत-बियाण्यांचे दर, मजुरीचा वाढता खर्च आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता वीज पुरवठ्याचा सुरू असलेला लपंडाव शेतीसाठी घातक ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वेळेवर पाणी मिळाले नाही तर ऊस पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या गंभीर परिस्थितीबाबत लवकरच वीज विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन समस्या मांडण्यात येणार असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. लिंक लाईन व बॅक कॅपेसिटरचे काम तातडीने पूर्ण करून अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा संतप्त शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीचा कणा असलेल्या वीज पुरवठ्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास येत्या काळात शिवारात उभ्या असलेल्या ऊस पिकावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे वीज विभागाने तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

0 Comments