Ticker

6/recent/ticker-posts

नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणाचा संशय; कुडण ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामाचा प्रकार!



दैनिक लोकयुवा बोईसर :  पालघर जिल्हा प्रतिनिधी केविल पाटील 

कुडण ग्रामपंचायतीच्या हद्दीत तारापूर-बोईसर मुख्य मार्गालगत असलेल्या नैसर्गिक नाल्यावर (ओहळावर) विनापरवानगी दगडी बांधकाम आणि मातीचा भराव करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील जागेवर हा प्रकार घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास आगामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होणार आणि संभाव्य जलकोंडीला जबाबदार कोण राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली असता नैसर्गिक नाल्याच्या कडेला दगडी बांधकाम करण्यात आल्याचे आणि नाल्यालगत मोठ्या प्रमाणात मातीचा भराव झाल्याचे दिसून येते. नैसर्गिक जलप्रवाहाच्या मार्गात अशा प्रकारे हस्तक्षेप झाल्यास पावसाळ्यात पाणी साचणे, नाल्याचे पाणी अडणे तसेच लगतच्या परिसरात पाणी साचून नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाची तातडीने चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या प्रकरणी कुडण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. विजया म्हात्रे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी स्पष्ट केले की, "सदर कामासाठी कोणतीही रीतसर परवानगी घेण्यात आलेली नाही. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल."

केवळ कारवाईचे आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई कधी?

नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व आणि पाण्याचा मुक्त प्रवाह कायम राखणे ही पावसाळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ आश्वासन न देता तातडीने स्थळपाहणी करून बांधकाम व भरावाची मोजणी करावी, संबंधितांची चौकशी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आता कुडण ग्रामपंचायत प्रशासन या प्रकरणात किती गांभीर्याने पावले उचलते, संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई होते का आणि नैसर्गिक नाल्याचा मूळ प्रवाह सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


"प्रतिक्रिया 

कुडण ग्रामसेवक - भागवत कांबळे यांनीही ग्रामपंचायतीकडून "सदर बांधकामासाठी कोणता अर्ज प्राप्त नाही सदर बाकांवर नियमानुसार चौकशी करून योग्य ती कारवाही करण्यात येईल""

 परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आता या बांधकामामागे नेमके कोण आहे, हे शोधण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील जागेवर नैसर्गिक नाल्यात बांधकाम व भराव होत असताना संबंधित यंत्रणेचे लक्ष याकडे कसे गेले नाही? काम करणाऱ्याने कोणत्या अधिकारात नाल्याच्या परिसरात हस्तक्षेप केला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


Post a Comment

0 Comments