दैनिक लोकयुवा पालघर जिल्हा प्रतिनिधी फैजान खान
जव्हार : निसर्गाशी अतूट नाते जपत आपली संस्कृती, परंपरा आणि लोककला पिढ्यान्पिढ्या जतन करणाऱ्या आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात ‘थाळ’ वादनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साध्या वाद्यातून उमटणारा गंभीर नाद, त्याच्या साथीने रात्रभर गायल्या जाणाऱ्या देव-देवतांच्या कथा आणि पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देणारी गीते, यांमधून आदिवासी समाजाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जव्हार तालुक्यात आजही जिवंत आहे.
थाळ हे केवळ वाद्य नसून आदिवासी समाजाच्या श्रद्धा, लोकविश्वास आणि मौखिक परंपरेचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. पितळ किंवा काश्याच्या परातीसारख्या धातूच्या पात्राचा वापर करून या वाद्याची निर्मिती केली जाते. त्यातून विशिष्ट पद्धतीने नाद निर्माण केला जातो. काही परंपरांमध्ये मेणासारख्या नैसर्गिक पदार्थांचाही वापर केला जातो. या वादनातून निर्माण होणारा गंभीर आणि घुमणारा नाद वातावरणात वेगळेच आध्यात्मिक चैतन्य निर्माण करतो.
**रात्रभर रंगतो लोककथांचा जागर**
आदिवासी समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये थाळ वादनाला विशेष स्थान आहे. थाळच्या निनादासोबत देव-देवतांच्या कथा, पूर्वजांच्या आठवणी आणि समाजजीवनाशी संबंधित लोकगीते गायली जातात. संध्याकाळी सुरू होणारा हा कथागायनाचा जागर अनेकदा रात्रभर चालतो. या गीतांमधून सृष्टीविषयक कल्पना, श्रद्धा, जीवनमूल्ये आणि परंपरागत ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवले जाते.
विशेष म्हणजे, या मौखिक परंपरेतून लिखित स्वरूपात नोंद न झालेल्या अनेक लोककथा आणि सांस्कृतिक आठवणी जतन होतात. ज्येष्ठांकडून ऐकलेल्या कथा आणि गीतांच्या माध्यमातून तरुण पिढीला आपल्या समाजाच्या इतिहासाची व सांस्कृतिक ओळखीची जाणीव होते. दशक्रिया विधीत श्रद्धेचा भावस्पर्शी आविष्कार
आदिवासी समाजातील काही समुदायांमध्ये मृत्यूनंतरच्या दशक्रिया विधीच्या आदल्या रात्री थाळ वादनाची परंपरा आहे. या वेळी देव-देवतांच्या कथा, पूर्वजांच्या स्मृती आणि पारंपरिक गीते सादर केली जातात. मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याबरोबरच दुःखात असलेल्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याचे कामही या सामूहिक परंपरेतून होते.मृत्यूच्या दुःखद प्रसंगातही समाजाला एकत्र आणणारी ही परंपरा श्रद्धा, सामूहिकता आणि भावनिक आधार यांचे महत्त्व स्पष्ट करते.
**सांस्कृतिक वारशाच्या जतनाची गरज**
आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव वाढत असताना पारंपरिक वाद्ये, लोकगीते आणि मौखिक कथनपरंपरांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक झाले आहे. थाळ वादन जाणणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचे अनुभव नोंदवणे, त्यांच्या गीतांचे ध्वनिमुद्रण करणे, तरुणांना या कलेचे प्रशिक्षण देणे आणि सांस्कृतिक महोत्सवांतून तिला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, अशा प्रयत्नांतून हा वारसा अधिक समृद्ध करता येऊ शकतो.
आदिवासी संस्कृतीतील थाळचा निनाद हा केवळ संगीताचा स्वर नाही, तो पिढ्यांना जोडणारा, पूर्वजांच्या आठवणी जागवणारा आणि सांस्कृतिक अस्मिता जपणारा वारसा आहे. या परंपरेचे संवर्धन म्हणजे एका वाद्याचे जतन नव्हे, तर आदिवासी समाजाच्या समृद्ध लोकजीवनाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे धानोशी येथील टाळ वादक मंगळा चौधरी यांनी सांगितले .

0 Comments