मनरेगा कामकाजातील अनियमिततेच्या तक्रारी, चौकशी आणि माहिती अधिकाराच्या प्रश्नांवर ठोस कार्यवाही कधी? गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष!
बिलोली तालुका प्रतिनिधी: विनोद वाघमारे
बिलोली : बिलोली तालुक्यातील पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर आणि गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर विविध विकासकामांबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत असताना या तक्रारींची दखल घेऊन त्यावर वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने कार्यवाही केली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेषतः बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांबाबत विहीर बांधकाम, गोठे बांधकाम, वृक्षलागवड, शेततळे तसेच मजुरांची हजेरी, मस्टर रोल आणि कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत तक्रारी उपस्थित करण्यात आल्या आहेत. या कामांच्या नोंदी, मोजमाप पुस्तिका, देयके आणि प्रत्यक्ष कामांची पडताळणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यासंदर्भात पंचायत समिती बिलोली येथे निवेदन देऊन संबंधित कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तक्रारींवर नेमकी कोणती कार्यवाही झाली, चौकशीचा अहवाल काय आहे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामांमध्ये पारदर्शकता राखणे, शासकीय निधीचा योग्य विनियोग होतो की नाही यावर देखरेख ठेवणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे ही पंचायत समिती प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार यांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी होत आहे.
तक्रारींची चौकशी कागदोपत्रीच राहणार की प्रत्यक्ष कारवाई होणार? असा सवाल आता उपस्थित होत असून, पंचायत समिती प्रशासनाने संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून चौकशी अहवाल आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार यांची अधिकृत बाजू तसेच संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे समोर येणेही महत्त्वाचे आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि पुढे कोणती कारवाई करते, याकडे बिलोली तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 Comments