दिग्रस लोकयुवा दिग्रस
तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे
मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, एकाग्रतेवर आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन चिरकुटा येथील स्व. देवराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ‘मोबाईलचा अतिवापर, तणाव व्यवस्थापन आणि आनंददायी शिक्षण’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत संमोहनतज्ज्ञ व प्रेरणादायी वक्ते प्रा. विशेष पवार यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास यांविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा ज्ञान मिळविण्याचे महत्त्वाचे साधन असला, तरी त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या वेळेवर, अभ्यासाच्या सवयींवर आणि मानसिक एकाग्रतेवर परिणाम करू शकतो. मोबाईलचा वापर टाळण्यापेक्षा त्याचा योग्य, मर्यादित आणि शैक्षणिक उपयोग कसा करावा,याचे महत्त्व प्रा.विशेष पवार यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. तणावाचे योग्य व्यवस्थापन करून अभ्यास आनंददायी कसा बनवता येतो, यावरही त्यांनी विशेष प्रकाश टाकला.
‘वाचलेले लक्षात का राहत नाही? ऐन परीक्षेच्या वेळी उत्तर आठवत का नाही?’ या विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजावून सांगितले. केवळ पुस्तकासमोर तासन्तास बसणे म्हणजे अभ्यास नव्हे, तर एकाग्रतेने वाचन करणे, समजून घेणे, उजळणी करणे आणि स्वतःची स्मरणशक्ती तपासणे ही प्रभावी अभ्यासाची सूत्रे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना आत्मसूचनेचे महत्त्व समजावून सांगताना सकारात्मक विचार, स्वतःवरील विश्वास आणि मनाला योग्य दिशा देणाऱ्या सूचनांचा उपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले. संमोहनशास्त्राशी संबंधित संकल्पना आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनाची एकाग्रता, विचारांची दिशा आणि आत्मविश्वास यांविषयी अनुभवाधारित माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासपद्धतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली.
“शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन नसून स्वतःला ओळखण्याचे, स्वतःतील क्षमता विकसित करण्याचे आणि जीवनात ध्येय गाठण्याचे माध्यम आहे. अभ्यासाचा ताण घेण्यापेक्षा अभ्यासाची गोडी निर्माण करा; कारण आनंदाने केलेले शिक्षणच व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देते,” असा प्रेरणादायी संदेश या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. विशेष पवार यांचे प्राचार्य देवस्थळे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले. यावेळी मिलिंद पवार.यश संतोष चव्हाण गोपाल चव्हाण अनिकेत विशाल राठोड यावेळी उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी सकारात्मक दृष्टिकोन, मोबाईलच्या वापराबाबत सजगता आणि तणाव हाताळण्याची समज निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरली.

0 Comments