मानोरा चौक ते जुना बसस्थानक मार्ग वर्षभरापासून अपूर्ण
दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे
दिग्रस शहरातील मानोरा चौक ते जुना बसस्थानक या महत्त्वाच्या मार्गाचे काम जवळपास वर्षभरापासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच महामार्गाच्या कामादरम्यान जलवाहिनीला वारंवार गळती लागण्याच्या घटना घडत असल्याने रस्त्याचे काम पुन्हा रखडले आहे. परिणामी नागरिकांना अपूर्ण रस्ता, खोदकाम, धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
१२ सप्टेंबर २०२६ रोजी जुना बसस्थानक परिसरात महामार्गाच्या कामादरम्यान पाणीपुरवठ्याची पाइपलाइन फुटल्याने नुकताच तयार केलेला रस्ता पुन्हा खोदावा लागला. यापूर्वी २० जुलै २०२६ रोजी स्टेट बँक परिसरात रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबीचा फटका मुख्य जलवाहिनीला बसला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते.
२६ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. त्यानंतर पाइपलाइनला गळती लागल्याने पुन्हा दुरुस्ती करावी लागली. तसेच ७ जानेवारी २०१९ रोजी सावंगा बु. परिसरात महामार्गाच्या कामादरम्यान मुख्य पाइपलाइन नादुरुस्त झाली होती.
वारंवार पाइपलाइन फुटण्याच्या घटना पाहता महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वी अस्तित्वातील जलवाहिन्यांचे योग्य सर्वेक्षण झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभागात पुरेसा समन्वय आहे का, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा आहे.
सार्वजनिक निधीतून तयार केलेला रस्ता पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून पाइपलाइनचे कायमस्वरूपी संरक्षण किंवा स्थलांतर करावे आणि रखडलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी दिग्रसकरांकडून होत आहे

0 Comments