दै लोकयुवा मानोरा(जगदीश राठोड)
मानोरा:–शासनाने दुष्काळ जाहीर केला खरा, परंतु कोरडवाहू शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार सुरू असल्याची तीव्र प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उमटत आहे. दुष्काळग्रस्तांना हेक्टरी केवळ ८ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली असून त्यामध्येही अनेक निकष व अटींच्या चाळण्या लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मानोरा तालुका हा कोरडवाहू असून यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर ही सर्वच पिके हातची गेली आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रति एकरी किमान २० हजार रुपये खर्च धरल्यास हेक्टरी ५० हजार रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. बियाणे, खते, औषध फवारणी, मशागत, मजुरी यासाठी कर्ज काढून शेती केली, पण पावसाअभावी उत्पन्न शून्यावर आले आहे.
अशा परिस्थितीत शासनाकडून जाहीर करण्यात आलेला हेक्टरी ८ हजार रुपयांचा मदत निधी हा तुटपुंजा असून, हेक्टरी अर्धा लाख खर्च झालेल्या शेतकऱ्याच्या जखमेवर ८ हजार रुपयांची मलमपट्टी अपुरी पडणार आहे. त्यातही ई-केवायसी, सात-बारा, पीक पाहणी, विम्याचे निकष अशा अनंत चाळण्या बसविल्यामुळे अनेक शेतकरी या मदतीपासूनही वंचित राहणार आहेत.
केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करू नये. कोरडवाहू शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी किमान ५० हजार रुपये भरीव मदत, पीक विमा व कर्जमाफी द्यावी, अशी मागणी मानोरा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
दुष्काळाच्या काळात शासनाने संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना जगवण्यासाठी ठोस पाऊल उचलावे, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
*उपरोक्त समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक संजय पवार हे तालुका प्रशासनामार्फत शासनाला निवेदन देणार असून शेतकऱ्यांनी यासाठी उपस्थित राहण्याचे निवेदन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.*

0 Comments