Ticker

6/recent/ticker-posts

साखरा शिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह



दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे 

    तालुक्यातील साखरा शेत शिवारात आज, शनिवारी १० ऑक्टोबर सकाळी ६ वाजता एका ३५ वर्षीय तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    निलेश दत्ता आडे (वय ३५, रा. साखरा) असे मृतकाचे नाव आहे. तालुक्यातील साखरा शेत शिवारातील आनंद बीजमवार यांच्या शेतात आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका निंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने निलेश आडे यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत गावकऱ्यांच्या निदर्शनास आला.

   घटनेची माहिती मिळताच साखरा येथील पोलीस पाटील हिरालाल मोतीलाल डोंगरे यांनी तातडीने दिग्रस पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मानसिक त्रासातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईक आरोप करीत आहे.

 या प्रकरणी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे निलेश यांची पत्नी गेल्या सुमारे दोन वर्षांपासून माहेरी राहत असल्याची माहिती समोर येत आहे. मृतकाच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती.

    सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करतारसिंग रुडे व रवींद्र चव्हाण करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

Post a Comment

0 Comments