खड्डे, अंधार, पुलाचे कठडे अन् चिडीमारीवरून नागरिकांचा प्रशासनावर संताप; उत्सवाच्या तयारीपेक्षा नागरी समस्यांवरच रंगली बैठक
दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे
आगामी दुर्गादेवी उत्सव, शारदा उत्सव आणि श्री घंटीबाबा यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी दिग्रस पोलीस ठाण्यात बुधवारी (८ ऑक्टोबर) सायंकाळी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. मात्र, उत्सवाच्या नियोजनापेक्षा शहरातील खड्डे, अंधार, पाणीगळती, असुरक्षित पूल, कचरा आणि रोडरोमिओंच्या उपद्रवावरून नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला. नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर उपस्थितांनी अक्षरशः प्रश्नांचा भडिमार केला.
बैठकीस तहसीलदार मयूर राऊत, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, नगराध्यक्ष पंचशीला इंगोले, उपनगराध्यक्ष सचिन बनगीनवार, नगरसेवक नूर मोहम्मद खान, बांधकाम अभियंता अक्षय राठोड, आरोग्य निरीक्षक धीरज जाधव यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व विविध उत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीतही शहरातील ठिकठिकाणच्या पाईपलाईन लिकेजमधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा मुद्दा मनोज राठोड यांनी उपस्थित केला. शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
‘नगर परिषद मुख्याधिकारी दिसत नाहीत, शहर अंधारात आहे!’ असा थेट सवाल राहुल देशपांडे यांनी उपस्थित केला. बंद पथदिव्यांमुळे शहरातील अनेक भाग अंधारात असून सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांना रस्त्यांवरील कचरा व घाणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी संतापाने सांगितले.
पुलाला कठडे नाहीत; भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दिग्रस-आर्णी पुलाला अद्याप सुरक्षात्मक कठडे नसल्याचा गंभीर मुद्दा अरबाज धारिवाला यांनी उपस्थित केला. नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक या पुलाचा वापर करतात. वारंवार निवेदने देऊनही कठडे बसविण्यात आले नाहीत; एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने कठडे बसविण्याची मागणी केली.
श्री भवानी माता मंदिर परिसरातील अंतर्गत तसेच बाहेरील रस्त्यांची कामे रखडल्याबद्दल प्रमोद बनगीनवार यांनी जाब विचारला. देवी विसर्जनासाठी प्रशिक्षित गोताखोरांची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली. दीपक वानखडे यांनी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मुरूम टाकून रोलर फिरविण्याची मागणी केली.उत्सवाच्या नऊ दिवसांत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांचे फिरते पथक तसेच तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्याची सूचना ताराचंद पवार यांनी केली.
ट्रिपल सीट अन् रोडरोमिओंवर कारवाईची मागणी
शहरातील वाढत्या ट्रिपल सीट दुचाकी, कर्णकर्कश बुलेट आणि मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंच्या उपद्रवाचा मुद्दाही बैठकीत गाजला. नगरसेवक नूर मोहम्मद खान यांनी अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
‘रोडरोमिओंना आता खैर नाही’; पोलिसांचे विशेष पथक
नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी रोडरोमिओ आणि कर्णकर्कश सायलेंसर लावून शहरात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईसाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्याची घोषणा केली.
महिला भाविकांना त्रास होऊ नये म्हणून पायी जाणाऱ्या मार्गावर लाल माती टाकण्याचे निर्देश देण्यात आले. अपघातास कारणीभूत ठरणारे अवैध होर्डिंग्ज तीन दिवसांत हटविण्याचे आदेशही देण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख यांनी सण-उत्सव डीजेमुक्त ठेवण्याचे आवाहन करत ढोल-ताशा आणि लेझीमसारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे सांगितले.गणेश विसर्जन मिरवणुकीतील उत्कृष्ट देखाव्यांचे परीक्षण करून संबंधित मंडळांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
बैठकीस अरबाज धारिवाला, राजेंद्रसिंह चौहान, दीपक वानखडे, संतोष झाडे, प्रमोद बनगीनवार, रवींद्र अरगडे, श्याम पाटील महिंद्रे, दिनेश धाडवे, विनायक दुधे, पूनम पटेल, स्वप्नील दुधे, मोहम्मद पप्पूवाले यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, पत्रकार आणि विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments