Ticker

6/recent/ticker-posts

परवानगीपूर्वी मंडप उभारणीला MIDCचा ब्रेक!


मोकळा भूखंड क्र. ४६/२ वरील काम तात्काळ थांबविण्याचे निर्देश; परवानगी घेतल्यानंतरच मंडप उभारण्याची सक्त ताकीद


पालघर, जिल्हा प्रतिनिधी केविल पाटील :

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोईसर-पालघर मार्गावरील खैरेपाडा उड्डाणपुलालगत असलेल्या MIDCच्या ओपन स्पेस क्र. ४६/२ येथे सुरू असलेल्या मंडप उभारणीच्या कामाला अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) ब्रेक लावला आहे. संबंधित भूखंडाच्या वापरासाठी आवश्यक परवानगी अद्याप प्राप्त झालेली नसताना मंडप उभारणीचे काम सुरू असल्याने MIDCच्या तारापूर उपअभियंता कार्यालयाने सद्यस्थितीत सुरू असलेले काम तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात MIDCच्या तारापूर उपअभियंता कार्यालयाकडून संबंधित नवरात्रोत्सव मंडळाला लेखी पत्र देण्यात आले आहे. या पत्रात सदर मोकळ्या भूखंडावरील काही क्षेत्र नवरात्रोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर मिळण्याबाबत मागणी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मागणीच्या अनुषंगाने परवानगीबाबतचा प्रस्ताव MIDCच्या मुख्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.मात्र, परवानगीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसताना संबंधित ठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.  त्यामुळे “प्रथम परवानगी, त्यानंतरच मंडप उभारणी” अशी स्पष्ट भूमिका घेत MIDCने काम तातडीने थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

परवानगी मिळाल्यानंतरच काम करा; अन्यथा कारवाईचा इशारा

MIDCच्या पत्रात संबंधित भूखंडावर मंडप उभारणीसाठी MIDC विभागाची आवश्यक परवानगी प्राप्त केल्यानंतरच मंडपाचे काम सुरू करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सध्या सुरू असलेले काम त्वरित थांबवावे; अन्यथा MIDCच्या नियमानुसार कारवाई करण्यात येऊ शकते, अशी ताकीदही देण्यात आली आहे.

या पत्राची प्रत एमआयडीसी पोलीस ठाणे, बोईसर यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे. त्यामुळे परवानगीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मंडप उभारणीच्या प्रकरणाकडे आता संबंधित यंत्रणांचेही लक्ष लागले आहे.

दोन प्रस्ताव, एकच जागा; अखेर प्रशासनाची भूमिका स्पष्ट

सदर जागेसाठी दोन स्वतंत्र मंडळांकडून प्रस्ताव सादर झाल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. त्यामुळे एकाच भूखंडाच्या वापराबाबत प्रशासनाकडून अंतिम निर्णय होण्यापूर्वीच प्रत्यक्ष मंडप उभारणी सुरू झाल्याने प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, MIDCच्या ताज्या पत्रामुळे अंतिम परवानगी मिळण्यापूर्वी मंडपाचे काम सुरू करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवरात्रोत्सवाच्या आयोजनाला विरोध नसून, सार्वजनिक उत्सवांच्या आयोजनासोबत प्रशासकीय परवानग्या आणि सुरक्षा नियमांचे पालन होणे आवश्यक आहे, अशी नागरिकांची भूमिका आहे. त्यामुळे MIDCने घेतलेल्या या निर्णयामुळे परवानगीपूर्वी सुरू असलेल्या उभारणीला आळा बसला असून, आता संबंधित मंडळाला आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील काम करता येणार आहे.

“परवानगी आधी, मंडप नंतर!” — MIDCचा स्पष्ट आदेश; ओपन स्पेस ४६/२ वरील सुरू असलेली उभारणी थांबवली

Post a Comment

0 Comments