Ticker

6/recent/ticker-posts

रावळगावात दूध तापवताना तयार झाला रबरासारखा पदार्थ



दैनिक लोक युवा प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे

रावळगाव येथे कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आणलेले दूध तापवताना त्यापासून रबरासारखा लांबट व चिकट पदार्थ तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दूध नेहमीप्रमाणे न आटता त्याचा लवचिक गोळा तयार झाल्याने उपस्थित नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या घटनेमुळे दुधाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित दुधाची तातडीने तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

रावळगाव येथील नामांकित शिव गणेश नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी रात्री कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील एका डेअरीमधून सुमारे २५ लिटर दूध खरेदी केले होते. दुसऱ्या दिवशी दुधाचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने हे दूध आदल्या दिवशीच आणून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कार्यक्रमासाठी दूध तापविण्यात आले. मात्र, दूध तापवायला ठेवल्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत त्यामध्ये विचित्र बदल दिसून येऊ लागला. नेहमीप्रमाणे दूध आटण्याऐवजी त्याचा चिकट गोळा तयार होऊ लागला. हा गोळा रबरासारखा लवचिक असून, तो ओढल्यानंतर तब्बल पाच ते सात फुटांपर्यंत ताणला जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

दुधाचा असा अनपेक्षित प्रकार पाहून कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिक थक्क झाले. कोजागिरी पौर्णिमेसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणलेल्या दुधाबाबत हा प्रकार घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दुधाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत असून, हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दुधाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर

दूध तापवल्यानंतर रबरासारखा चिकट पदार्थ तयार होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुधाची गुणवत्ता, साठवणूक किंवा इतर संभाव्य कारणांची शास्त्रीय तपासणी केल्यानंतरच या प्रकारामागील वस्तुस्थिती समोर येऊ शकते. त्यामुळे केवळ या घटनेवरून दूध भेसळयुक्त किंवा केमिकलयुक्त असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी करावी

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने संबंधित डेअरीतील दुधाचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तपासणीत दुधामध्ये भेसळ किंवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकरणांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. दुधाच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेला संशय दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी रावळगाव परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments