Ticker

6/recent/ticker-posts

प्रस्तावित एमआयडीसीविरोधात आदिवासी ग्रामस्थांचा एल्गार; ‘जमीन वाचवा’चा बुलंद नारा!



महागाव, मान वारंगडे, गुंदले परिसरातील भूसंपादनाला विरोध; सुनावण्या, फेरफार नोंद आणि जमीन मोजणी रद्द करण्याची मागणी ; विराज प्रोफाइल औद्योगिक कारखाना विस्ताराला विरोध


दैनिक लोकयुवा पालघार प्रतिनिधी: केविल पाटील 

पालघर : पालघर तालुक्यातील मौजे महागाव, वारंगडे आणि गुंदले परिसरात प्रस्तावित एमआयडीसीच्या भूसंपादनाविरोधात आदिवासी व स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. भूमिसेना आदिवासी एकता परिषद यांच्या माध्यमातून आयोजित या आंदोलनात ‘एमआयडीसी हद्दपार, जमीन वाचवा!’ असा बुलंद नारा देत भूमिपुत्रांच्या जमिनी आणि हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. प्रस्तावित भूसंपादनाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीला विरोध दर्शवत आंदोलकांनी आपल्या चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

भूसंपादनाच्या कार्यवाहीला विरोध

उपविभागीय अधिकारी कार्यालयात भूसंपादनासंदर्भात सुरू असलेल्या सुनावण्या तातडीने रद्द कराव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. संबंधित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर २२ जुलै २०२६ रोजी नोंदविण्यात आलेला फेरफार क्रमांक ७७६ रद्द करण्यात यावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रस्तावित असलेली संबंधित जमिनींची मोजणी प्रक्रिया रद्द करून ती तातडीने थांबवावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. जमीन मोजणीच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

बारीपाड्यातील औद्योगिक कामावरही आक्षेप

आंदोलनातील चौथ्या मागणीत बारीपाडा परिसरात विराज प्रोफाइल औद्योगिक कारखान्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे कथित बेकायदेशीर व बळजबरीचे काम तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कामाच्या स्वरूपाची प्रशासनाने चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्षाची भूमिका

प्रस्तावित एमआयडीसी भूसंपादनामुळे स्थानिकांच्या जमिनी, हक्क आणि भविष्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. त्यामुळे भूसंपादनासंदर्भातील सर्व कार्यवाहीबाबत प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

२२ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित जमीन मोजणीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला पुढे कोणते वळण मिळते आणि प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे महागाव, मान, वारंगडे, गुंदले आणि बारीपाडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments