महाराष्ट्र ग्रामीण बँक, मानोरा शाखा व्यवस्थापकाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
दै. लोकयुवा मानोरा | जगदीश राठोड
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात बँकेकडून सहकार्य मिळण्याऐवजी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करत महाराष्ट्र ग्रामीण बँक, मानोरा शाखेच्या व्यवस्थापकाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. नविन सोनखास येथील शेतकरी गोपाळकृष्ण नामदेव चव्हाण यांनी १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे लेखी निवेदन दिले.
चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, मौजा देवठाणा, ता. मानोरा येथील त्यांच्या शेतजमिनीवर यापूर्वी शेतीसाठी कर्ज सुविधा मिळत होती. कर्जमाफी योजनेअंतर्गत पूर्वीचे कर्ज माफ झाले असून सध्या कोणत्याही बँकेची थकबाकी नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पीक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेत गेल्यानंतर शाखा व्यवस्थापकांनी अर्जाचा विचार न करता उद्धट भाषेत बोलून बँकेतून बाहेर जाण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“तुमच्याकडून जे होईल ते करा, मी कर्ज मंजूर करणार नाही,” अशा स्वरूपाचे उत्तर मिळाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्याच्या कर्ज अर्जाची नियमानुसार तपासणी करून कारणासहित निर्णय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी तसेच पात्रता असल्यास पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

0 Comments