Ticker

6/recent/ticker-posts

विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची एकतुनी येथील ७६५ केव्ही उपकेंद्राला शैक्षणिक भेट



*अति-उच्च दाब विद्युत पारेषण तंत्रज्ञान, संरक्षण प्रणाली आणि नियंत्रण कक्षाच्या कार्यप्रणालीची घेतली प्रत्यक्ष माहिती*


जालना / संतराम जाधव

*दि. ८ ऑक्टोबर :* विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन, अंबड, जि. जालना येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकतुनी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) ७६५ केव्ही अति-उच्च दाब उपकेंद्राला शैक्षणिक भेट दिली.

गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी आयोजित या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना ७६५ केव्ही विद्युत पारेषण प्रणालीची कार्यपद्धती, उपकेंद्रातील विविध विद्युत उपकरणांची रचना व कार्य, विद्युत संरक्षण प्रणाली, नियंत्रण व देखभाल प्रक्रिया तसेच अत्याधुनिक नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली. उपकेंद्रातील प्रत्यक्ष उपकरणे आणि यंत्रणांचे निरीक्षण करताना विद्यार्थ्यांना अति-उच्च दाब विद्युत पारेषणामागील तांत्रिक प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळाली.

याप्रसंगी महापारेषणचे कार्यकारी अभियंता श्री. महेंद्र वाकळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रफुल बावसकर, श्री. प्रेषित सोनकांबळे आणि श्रीमती रेखा अहीरे यांनी विद्यार्थ्यांना उपकेंद्राची कार्यप्रणाली, विद्युत पारेषणातील तांत्रिक बाबी, उपकरणांचे नियंत्रण आणि नियमित देखभालीचे महत्त्व यांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकेंद्राच्या यार्डमध्ये नेऊन विविध विद्युत उपकरणांची कार्ये, त्यांची उपयुक्तता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी समजावून सांगण्यात आली. तसेच सहाय्यक अभियंता श्री. आकाश नवाते, श्री. केशव खरात, श्री. ढवळे आणि उपकेंद्रातील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक तांत्रिक माहिती व सहकार्य केले.

*पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड*

अभ्यासक्रमात शिकविण्यात येणाऱ्या विद्युत पारेषण, संरक्षण प्रणाली आणि विद्युत उपकरणांशी संबंधित संकल्पनांचा प्रत्यक्ष औद्योगिक कामकाजाशी असलेला संबंध विद्यार्थ्यांना या भेटीतून स्पष्ट झाला. अति-उच्च दाबाच्या विद्युत प्रणालीमध्ये सुरक्षितता, अचूक नियंत्रण, नियमित देखभाल आणि तांत्रिक दक्षता यांना किती महत्त्व आहे, याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जाणीव झाली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडण्यासोबतच आधुनिक विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील रोजगाराच्या आणि करिअरच्या विविध संधींचीही ओळख झाली.

या शैक्षणिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य श्री. बी. एस. पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या प्रभारी विभागप्रमुख श्रीमती एस. डी. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्राध्यापक श्री. एस. एन. ढमाले, श्रीमती बी. आर. बक्षी, श्री. जी. सी. डाबेराव आणि श्री. एस. ए. तारकसे यांनी विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित राहून या शैक्षणिक भेटीचे नियोजन व समन्वय साधला.

या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख श्रीमती एस. डी. परदेशी आणि प्राध्यापक श्री. एस. एन. ढमाले यांनी संस्थेच्या वतीने उपकेंद्राचे कार्यकारी अभियंते, अधिकारी आणि कर्मचारीवर्गाचे आभार व्यक्त केले.

अत्याधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देणाऱ्या अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांचे केवळ सैद्धांतिक ज्ञान दृढ करत नाहीत, तर त्यांच्यात तांत्रिक निरीक्षणक्षमता, व्यावहारिक कौशल्ये आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोनही विकसित करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील औद्योगिक आव्हानांसाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.


Post a Comment

0 Comments