Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत ७ ऑक्टोबरला; प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी



भूम (कुणाल लगाडे): 

महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या दि.०१ सप्टेंबर २०२६ ते दि.३१ मार्च २०२७ या कालावधीमध्ये महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत भूम तालुक्यातील प्रलंबित महसुली दावे व प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी महसूल लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.महसूल प्रशासनातील अनेक दावे व प्रकरणे विविध कारणांमुळे दीर्घकाळ प्रलंबित राहतात. त्यामुळे संबंधित पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. अनेक वेळा निकालानंतरही पक्षकारांकडून पुढील अपील दाखल केल्याने प्रकरणे वर्षानुवर्षे सुरू राहतात. 

या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याच्या उद्देशाने महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येत आहे.तहसील कार्यालय, भूम तसेच मंडळ अधिकारी कार्यालयांत दाखल असलेल्या महसुली दावे व प्रकरणांचा या लोक अदालतीत समावेश करण्यात येणार आहे. लोक अदालत ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली असून, संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.लोक अदालतमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी इच्छुक पक्षकारांनी विहित नमुन्यातील अर्ज ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संबंधित कार्यालयात सादर करावेत. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून आपली प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन तहसीलदार जयवंत पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments