Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांचा ५% निधी दिवाळीपूर्वी द्या



अन्यथा पंचायत समितीतच दिवाळी साजरी करू भूमिपुत्र संघटने’चा इशारा


दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे 

दिग्रस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी दिवाळी सणापूर्वी तत्काळ वितरित करावा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयातच ठिय्या आंदोलन करून दिवाळी साजरी करू, असा आक्रमक पवित्रा ‘भूमिपुत्र संघटना दिव्यांग सेल’ने घेतला आहे. यासंदर्भात संघटनेतर्फे गटविकास अधिकारी पंजाबराव रणमले यांना शेकडो दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.

तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य शेतकरी व दुर्बल घटकांचे हाल होत असून, दिव्यांग बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. सणासुदीच्या काळात औषधोपचार, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. अशा बिकट स्थितीत ग्रामपंचायतींचा हक्काचा ५% राखीव निधी दिवाळीपूर्वी मिळाला, तरच त्यांची दिवाळी गोड होऊ शकेल.

प्रशासनाने तात्काळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आदेश देऊन हा निधी वितरित करावा; अन्यथा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन पंचायत समितीत तीव्र आंदोलन छेडू, असा थेट इशारा भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल चव्हाण यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments