बोरगाव प्रतिनिधी : जय गांगुर्डे
सुरगाणा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुरगाणा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर २०२६) कार्यकारी दंडाधिकारी, तहसील कार्यालय, सुरगाणा यांना निवेदन सादर करण्यात आले. तालुक्यातील १७ ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष घालून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सुरगाणा तालुका हा प्रामुख्याने आदिवासीबहुल, डोंगराळ व दुर्गम भाग आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि जलसंपत्ती उपलब्ध असूनही तालुक्यातील नागरिकांना आजही पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन, रोजगार, दर्जेदार रस्ते, अखंडित वीजपुरवठा आणि सार्वजनिक वाहतुकीसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे प्रलंबित बोनस, पीकविमा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि विविध सार्वजनिक सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे. तसेच अनेक वर्षांपासून बंद असलेले नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज पूर्ववत सुरू करावे, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याच्या मागणीचा विचार करावा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कमी करावे, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
बोरगाव–खरुडे रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव–खरुडे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिक आणि वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे विद्यार्थी, शेतकरी, स्थानिक नागरिक तसेच रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या निवेदनातून करण्यात आली आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी व रोजगार उपलब्ध करा
तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक त्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. रोजगार हमी योजनेची कामे नियमित सुरू करून पात्र मजुरांना वेळेत काम आणि मजुरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नार-पार नदीजोड प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या नियोजनात सुरगाणा तालुक्याच्या गरजांना प्राधान्य देऊन स्थानिक शेतकऱ्यांसाठी आवश्यक पाणीसाठा आरक्षित करावा. घाटमाथ्यावरील पाणीवाटपासाठी बोगद्याऐवजी पाटाद्वारे पाणी आणण्याच्या पर्यायाचाही तांत्रिकदृष्ट्या विचार करावा, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
शासनाने मागण्यांची दखल घ्यावी
सुरगाणा तालुक्यातील जनतेच्या न्याय्य मागण्यांना वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे निवेदन सादर करण्यात आले आहे. सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करून आपल्या स्तरावरून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी आणि संबंधित मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
या निवेदनावर सुरगाणा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष तुकाराम किसन जाधव, कार्याध्यक्ष चंद्रकांत भोये आणि जिल्हा उपाध्यक्ष सखाराम भोये आदी सह उपस्थित होते.
यावेळी मधुकर कनुभाऊ कहांडोळे, देवाजी भिका चव्हाण, रामदास जयराम गायकवाड, प्रवीण किशन वाघ, चरण नारायण, श्रवण रोहिदास, शंकर थविल, योगेश प्रभाकर महाले, जयवंत भास्कर थविल, पांडुरंग सोबू भोये, , संजय मोतिराम मोरे, जगन संपत गायकवाड, धनराज यशवंत, वैभव संजय गावित, सुभाष रामवाय हेरलुख आणि कृष्णा सयाजी गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आता प्रशासन या प्रश्नांची दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही कधी करणार, याकडे सुरगाणा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 Comments