Ticker

6/recent/ticker-posts

मंजूर रस्त्याचे काम रखडल्याने माजलगावात नागरिकांचा सिंदफणा नदीपुलावर दोन तास तीव्र रास्ता रोको

 



जिल्हा प्रतिनिधी =सागर काळे 

माजलगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते झेंडा चौक-आंबेडकरनगर दरम्यानच्या मंजूर रस्ता आणि नाली बांधकामाचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी सिंदफणा नदीपुलावर तब्बल दोन तास तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. माजी नगरसेवक रोहन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

संबंधित कामाला प्रशासकीय मंजुरी आणि कार्यारंभ आदेश मिळूनही प्रत्यक्षात काम सुरू न झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. यापूर्वी प्रशासनाने पाहणी करून पंधरा दिवसांत काम सुरू करण्याचे दिलेले लेखी आश्वासन न पाळल्याने संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. सध्या सुरू असलेला श्रावण महिना आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील पुरातन सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांना खड्डेमय रस्त्यामुळे प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अखेर माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी बालवडकर यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी धाव घेऊन येत्या चार दिवसांत रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.


Post a Comment

0 Comments