नियमभंग करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
पालघर | जिल्हा प्रतिनिधी केविल पाटील
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दाभोसा धबधबा येथे उभारण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित स्काय वॉक पुलाचे उद्घाटन येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात येणार असून, अधिकृत उद्घाटनापूर्वी पुलावर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत स्काय वॉकच्या सुरक्षाविषयक उपाययोजना, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा आणि उद्घाटनपूर्व तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला.
बैठकीत पालकमंत्र्यांनी कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सर्व प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच पार्किंग व्यवस्था, लेन मार्किंग, गर्दी नियंत्रण, प्रवेश व्यवस्थापन आणि इतर पायाभूत सुविधा १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.उद्घाटनापूर्वी काही नागरिकांनी स्काय वॉकवर प्रवेश केल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकृत उद्घाटनापर्यंत कोणालाही प्रवेश देऊ नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्काय वॉकवर एकावेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा, त्यांचा मुक्काम कालावधी किती असावा तसेच प्रवेश शुल्काचे स्वरूप काय असावे याबाबत स्वतंत्र नियोजन करण्यात येत आहे. वन विभागालाही या पर्यटनस्थळाच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दाभोसा स्काय वॉक हा पालघर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर होणाऱ्या या उद्घाटनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
"१५ ऑगस्टपूर्वी स्काय वॉकवर प्रवेश करू नका"
प्रशासनाचे आवाहन • सुरक्षा तपासणी अंतिम टप्प्यात • नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई • पर्यटकांसाठी विशेष व्यवस्थापन योजना तयार.

0 Comments