श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे)
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जिवंत प्रतीक असलेल्या आषाढी वारीत यंदाही भाजपाचे नांदेड उत्तरचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी उत्साहाने सहभाग घेत जेजुरी ते वाल्हे हा टप्पा वारकऱ्यांसोबत पायी पूर्ण केला. विशेष म्हणजे, सलग २५ वर्षांपासून अखंडपणे वारीत सहभागी होण्याची त्यांची परंपरा यंदाही कायम राहिली.
यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार विनोद तावडे हे आपल्या परिवारासह दिंडीत सहभागी झाले. विठ्ठलाच्या नामघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरावटीत हजारो वारकऱ्यांसमवेत त्यांनी पायी चालत भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतला.
वारकरी संप्रदाय हा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी दिलेल्या समता, सेवा, भक्ती आणि मानवतेच्या विचारांचा अखंड प्रवाह आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी शिस्त, संयम आणि सेवाभाव जपत पायी वाटचाल करतात. जात, धर्म, पंथ आणि सामाजिक भेद विसरून "विठ्ठल" या एका नामात सर्वजण एकरूप होतात, हीच वारीची खरी ओळख आहे.
जेजुरी ते वाल्हे या मार्गावर दिंडीत चालताना सर्वत्र "ज्ञानोबा-तुकाराम", "पांडुरंग हरी" आणि "विठ्ठल विठ्ठल"च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. वारकऱ्यांमध्येही विनोद तावडे आणि सुधाकर भोयर यांच्याशी संवाद साधण्याची उत्सुकता दिसून आली.
"आषाढी वारी ही माझ्यासाठी केवळ धार्मिक यात्रा नाही, तर आत्मिक समाधान देणारी जीवनशाळा आहे. गेल्या सलग २५ वर्षांपासून वारकऱ्यांसोबत चालण्याचे भाग्य लाभत आहे. विठ्ठल नामाच्या गजरात आपण किती अंतर चाललो, याची जाणीवही होत नाही. वारकरी संप्रदायाने दिलेला समता, सेवा, शिस्त आणि मानवतेचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारला, तर समाज अधिक सुसंस्कृत आणि सशक्त बनेल. यंदा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोद तावडे हे परिवारासह दिंडीत सहभागी झाल्याने हा अनुभव अधिक संस्मरणीय ठरला."--सुधाकर भोयर मा.संघटन मंत्री भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभाग

0 Comments