Ticker

6/recent/ticker-posts

खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा; युवा ग्रामीण पत्रकार संघाचे बिलोलीत निवेदन



बिलोली प्रतीनीधी विनोद वाघमारे 

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वापरलेली भाषा आणि कथित धमकीच्या निषेधार्थ बिलोलीत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. खासदार पाटील यांच्यावर 'पत्रकार संरक्षण कायद्या'न्वये तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बिलोली तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी खासदार संजय दिना पाटील यांनी एका विषयावर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर संतप्त होत पत्रकारांना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व धमकी दिल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींचे असे वर्तन अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारे असून, यामुळे राज्यभरातील पत्रकार वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात बिलोलीचे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे आणि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष सय्यद रियाज, तालुकाध्यक्ष संजय कुमार बिलोलीकर, पत्रकार मारोती भुसावळे, मिलिंद मांजरमकर, राजकुमार गादगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

"पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा घटनात्मक अधिकार आहे. लोकप्रतिनिधींकडून अशी भाषा वापरली जाणे हे पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. अशा प्रकारांमुळे पत्रकार निर्भयपणे आपले कर्तव्य बजावू शकणार नाहीत. प्रशासनाने यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी."— सय्यद रियाज (तालुका कार्याध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ, बिलोली)

Post a Comment

0 Comments