वैजापूर | प्रतिनिधी : अर्जुन शिंदे
समृद्धी महामार्गावर शेळ्या हटविण्यास सांगितल्याच्या रागातून एका युवकाने वन विभागातील महिला वनपालाला कुऱ्हाड दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव परिसरात घडली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनपाल जयश्री भगत (वय ३७) या समृद्धी महामार्गावर कर्तव्य बजावत होत्या. शनिवारी (११ जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हडसपिंपळगाव परिसरात त्यांना ओमराज रंधे (रा. हडसपिंपळगाव, ता. वैजापूर) हा महामार्गावर शेळ्या चारताना आढळून आला.
वनपाल जयश्री भगत यांनी त्याला शेळ्या तातडीने महामार्गाबाहेर घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या सूचनेचा राग आल्याने त्याने शिवीगाळ केली. तसेच हातातील कुऱ्हाड दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर वनपाल जयश्री भगत यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (१३ जुलै) संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार किरण गोरे करीत आहेत.
समृद्धी महामार्गासारख्या अतिवेगवान मार्गावर जनावरे आणल्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 Comments