जळगाव | प्रतिनिधी महेशप्रसाद दिक्षित
राज्य शासनाच्या शिक्षकविरोधी धोरणांविरोधात आज (दि. ९ जुलै) महाराष्ट्रभर शिक्षकांचे राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन होत असून, जळगाव जिल्ह्यातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिल्याने अनेक शाळांमधील शिक्षक सामूहिक रजेवर गेले असून, अनेक शाळांचे शैक्षणिक कामकाज प्रभावित झाले आहे.
मतदार यादीच्या विशेष संघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांवर लादण्यात आलेल्या BLO व इतर अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना पूर्णपणे मुक्त करावे, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. याशिवाय शिक्षकांच्या प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवरही शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
आज सकाळी १०.३० वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने एकत्र येऊन शासनाच्या नावाने निवेदन सादर करणार आहेत. आंदोलनात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनांकडून देण्यात आली.
आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शिक्षकांना BLO व इतर सर्व अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे, सन २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET परीक्षेतून सूट देणे, पदोन्नतीमध्ये अनुभव व ज्येष्ठतेला प्राधान्य देणे, न्यायालयीन निर्णयानुसार प्राथमिक पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करणे तसेच वाडी-वस्ती-तांड्यावर कार्यरत शिक्षकांची जुनी सेवा ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेसाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचे सांगत जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सर्व शिक्षक संघटनांनी केले आहे.

0 Comments