Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठलवाडी–कल्याण बसच्या मार्ग व वेळेत बदल करण्याची छत्रपती संघटनेची मागणी



प्रतिनिधी : तानाजी किर्दत

 कल्याण , दि. १५ : मेढा आगारातून सध्या सुरू असलेल्या विठ्ठलवाडी–कल्याण बससेवेला अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्याने या बसच्या मार्गात व वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी मागणी छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली आहे.

संघटनेने या संदर्भात जा.क्र. ८५२२, दि. ०१ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, सध्याचा बसमार्ग अनेक प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत असून त्यामुळे बससेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, महामंडळालाही अपेक्षित महसूल प्राप्त होत नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

यासाठी सदर बसचा मार्ग बदलून मेढा–पनवेल–नेरळ–तुर्भे–कोपरखैरणे–महापे नाका–कल्याण फाटा–कल्याण–विठ्ठलवाडी असा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असून सातारा, जावळी, मेढा तसेच परिसरातील नागरिक नोकरी, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि इतर कामांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात नियमित ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर बससेवेला अधिक प्रवासी मिळून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

यासोबतच बसच्या वेळेतही बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ही बस सकाळी १०.०० वाजता मेढा येथून सुटावी तसेच रात्री १०.०० वाजता (२२:००) विठ्ठलवाडी येथून परतीच्या प्रवासासाठी रवाना व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळेमुळे मुंबई परिसरातील कामगार, कर्मचारी, विद्यार्थी व व्यावसायिकांना मोठा फायदा होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.

तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी या बससेवेला ऑनलाईन आरक्षण व आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना नियोजनबद्ध प्रवास करता येईल तसेच बससेवेचा वापर वाढण्यास मदत होईल.

छत्रपती संघटनेच्या मते, मार्ग व वेळेत सुचविलेले बदल केल्यास सातारा, जावळी, मेढा व परिसरातील ग्रामीण भागाचा मुंबई महानगर क्षेत्राशी अधिक सुलभ, जलद व थेट संपर्क प्रस्थापित होईल. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्याबरोबरच बससेवेतील प्रवासी संख्या वाढेल आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होईल.

प्रवाशांच्या हिताचा विचार करून सदर मागणीस तातडीने मंजुरी देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments