Ticker

6/recent/ticker-posts

सलग आंदोलनाला अखेर यश!


वाकला जि.प. शाळेला ३ शिक्षक तात्काळ; आणखी २ शिक्षक आठ दिवसांत देण्याचे आश्वासन..


लोक युवा नेटवर्क वैजापूर प्रतिनिधी : अर्जुन शिंदे

वैजापूर : वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकला (केंद्र लोणी खुर्द) येथील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न अखेर सलग आंदोलनानंतर मार्गी लागला आहे. मागील दोन वर्षांपासून शाळेतील तब्बल ८ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीने उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले.

जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाशजी पाटील गलांडे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी बापू जाधव आणि पंकज भैया ठोंबरे यांनी ३ शिक्षक तात्काळ तसेच आणखी २ शिक्षक आठ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

शिक्षकांच्या मागणीसाठी ३ जुलै रोजी शाळेला कुलूप लावून शाळा बंद आंदोलन, ४ जुलै रोजी थाळीनाद आंदोलन आणि ६ जुलै रोजी पायी दिंडी मोर्चा काढण्यात आला. सुमारे पाच किलोमीटरची दिंडी मुसळधार पावसात वाकला गावातून बाभूळतेल फाट्यापर्यंत काढण्यात आली. या दिंडीत जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्यांनीही विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसमवेत पावसात पायी चालत सहभाग घेतला.

यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर, त्यांचे सहकारी, शिवूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रनखांब, पोलीस उपनिरीक्षक पवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिलेल्या आश्वासनाची मुदतीत पूर्तता न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.


Post a Comment

0 Comments