जालना / संतराम जाधव
बीड जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने आज मराठा आंदोलनाचे नेते तथा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. ठेवीदारांच्या वतीने सचिन उबाळे यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली.
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम अर्बन, राजस्थानी, जिजाऊ यांसह अनेक पतसंस्थांमध्ये हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. मुदतपूर्ती होऊनही ठेवी परत न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून, उपचार, शिक्षण, शेती, व्यवसाय आणि दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची व्यथा शिष्टमंडळाने मांडली.
बैठकीदरम्यान सचिन उबाळे यांनी संबंधित संस्थांची सद्यस्थिती, शासन स्तरावर सुरू असलेल्या हालचाली आणि ठेवीदारांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच या प्रश्नात हस्तक्षेप करून ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची विनंतीही केली.
यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले,
"या संपूर्ण प्रकरणाचा मी सखोल अभ्यास करणार आहे. कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर काय करता येईल, हे पाहून योग्य ती भूमिका घेईन. एकदा या प्रश्नाच्या मागे लागलो, तर ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन."
जरांगे पाटील यांच्या या शब्दांमुळे उपस्थित ठेवीदारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.
बैठकीत पुढील काळात ठेवीदारांच्या प्रश्नावर व्यापक चर्चा करून पुढील दिशा निश्चित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. आवश्यक असल्यास पुन्हा बैठक आयोजित करून पुढील आंदोलनाची किंवा पाठपुराव्याची भूमिका जाहीर केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली

0 Comments