Ticker

6/recent/ticker-posts

जालन्यात 1080 'बटन गोळ्या' जप्त; नशा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

जालन्यात 1080 बटन गोळ्या जप्त केल्यानंतर आरोपींसह दहशतवाद विरोधी शाखेचे पथक. टेबलवर जप्त केलेल्या गोळ्यांचा साठा

दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई; 2 आरोपी ताब्यात, वसंत मेडिकलचा मालकही अटकेत

जालना / संतराम जाधव

जालन्यात अवैधपणे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 1080 बटन गोळ्यांची चोरटी विक्री करणाऱ्या रॅकेटवर दहशतवाद विरोधी शाखेने रविवारी मोठी कारवाई केली. या प्रकरणी जुना जालना येथील 27 वर्षीय शेख अफसर शेख अन्वर आणि कादराबाद येथील वसंत मेडिकलचा मालक विशाल शंकरआप्पा मिटकरी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपींकडून अल्प्राझोलमच्या 1080 गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गोळ्या 'बटन गोळी' म्हणून नशेसाठी वापरल्या जातात. जप्त केलेल्या गोळ्यांची बाजारातील किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.

प्राथमिक तपासात वसंत मेडिकलचा मालक विशाल मिटकरी हा मेडिकलच्या आडून नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. शेख अफसर हा ग्राहकांना गोळ्या पुरवण्याचे काम करत होता. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.

*पोलिस अधीक्षकांचे आवाहन :* जालना पोलीस जिल्ह्यात 'Say No To Drugs' मोहीम राबवत आहे. नशेच्या गोळ्या विकणाऱ्या किंवा सेवन करणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.

दरम्यान, दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दहशतवाद विरोधी शाखा करत आहे.


Post a Comment

0 Comments