Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील अभ्यासिकांच्या प्रकाशातून उजळले २५० पेक्षा अधिक जणांचे भविष्य



चिखली | प्रतिनिधी विनोद इंगळे 


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा, योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या अभ्यासिकांनी आज यशाची नवी उंची गाठली आहे. या अभ्यासिकांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांत तब्बल २५०पेक्षा अधिक युवक-युवतींनी सरकारी सेवेत यश मिळवून आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा गौरव वाढवला आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरांमध्ये जाऊन महागड्या क्लासेसमध्ये शिक्षण घेणे शक्य नसते. हीच अडचण ओळखून काही वर्षांपूर्वी अभ्यासिकांची संकल्पना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव मा. विद्याधरजी महाले साहेब व चिखलीच्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज व अभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय निर्माण करण्यात आली.

या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचा सकारात्मक परिणाम आज स्पष्टपणे दिसून येत आहे. अभ्यासिकांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाला असून त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिक्षण, रोजगार आणि युवक सक्षमीकरणाला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक तरुणांचे आयुष्य बदलले आहे.

विशेष म्हणजे, या २५० पेक्षा अधिक जणांच्या यशामुळे केवळ त्यांचे वैयक्तिक जीवनच बदलले नाही, तर त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. एका युवकाच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाची जीवनशैली सुधारते, ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या यशाला सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा मानली जात आहे..


Post a Comment

0 Comments