वैजापूर प्रतिनिधी : अर्जुन शिंदे.
वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथील शेतकरी अनिल सूर्यवंशी यांच्या गट क्रमांक १२६ मध्ये एप्रिल महिन्यात हिमालया कंपनीचे सोलर पंप बसविण्यात आले होते. मात्र सोलर पंप बसवून अनेक महिने उलटूनही आजपर्यंत या यंत्रणेद्वारे एक लिटरही पाणी उपसा करण्यात आलेला नसल्याचा गंभीर आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकरी अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले की, कंपनीचे कर्मचारी व प्रतिनिधी वारंवार आश्वासने देत असून प्रत्यक्षात समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कंपनीचे वेगवेगळे प्रतिनिधी असल्याने जबाबदारी स्वीकारण्यास कोणीही पुढे येत नाही. अनेकदा फोन करूनही काही प्रतिनिधी कॉल उचलत नाहीत, तर काही जण उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
दरम्यान, कंपनीकडून एकदा मोटार बदलून देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सोलर पंप सुरू झाला नसून शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत.
याबाबत दोन दिवसांच्या आत कंपनीने ठोस दखल घेऊन समस्या सोडवावी, अन्यथा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शेतकरी अनिल सूर्यवंशी यांनी दिला आहे. तसेच वेळेत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

0 Comments