Ticker

6/recent/ticker-posts

तलाठ्याच्या कारला हायवाची धडक; जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल....



वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे 

वैजापूर तालुक्यात अवैध गौणखनिज उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असलेल्या महसूल पथकाच्या वाहनाला हायवा वाहनाने जोरदार धडक देत तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लाखणी परिसरात घडली. याप्रकरणी हायवा चालकाविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांडकी येथील तलाठी अमरसिंग तेजराव बावनकर (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २० मे रोजी मध्यरात्री १२.४० वाजेच्या सुमारास महसूल विभागाचे गौणखनिज पथक शिवना नदी पात्रालगतच्या गावांमध्ये अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त घालत होते.

दरम्यान, जांबरखेडा ते लाखणी रोडवर निवृत्ती बारसे यांच्या शेताजवळ आरोपी शिवनाथ विश्वनाथ लंबे (रा. जांबरखेडा, ता. वैजापूर) याने त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाची टाटा कंपनीची हायवा (क्र. एमएच २० जीझेड ६७०६) महसूल पथकाच्या वाहनाच्या दिशेने भरधाव चालवत आणली. आरोपीने महसूल पथकाच्या एमएच ३५ एआर ०४६१ क्रमांकाच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कार सुमारे ५० फूट फरपटत गेली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

तलाठी बावनकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपीने जाणीवपूर्वक वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी दि. २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३६ वाजता शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्यांनी स्वतः तपास हाती घेतला आहे.

वाळू माफियांना कुणाचा पाठिंबा?

अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरच हायवा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याइतकी वाळू माफियांची हिंमत कशी होते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या भागातील काही पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत का, अशीही चर्चा सध्या सुरू झाली आहे.


Post a Comment

0 Comments