जिल्हा. प्रतिनिधी. सागर काळे
केज: तालुक्यातील एका १३ वर्षीय बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल ९ तास ताटकळत ठेवल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यत कसूर केल्याचा ठपका ठेवत केज उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता पाटील यांना २९ मे रोजी तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या असंवेदनशील कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'रुग्णसेवा आणि आरोग्य सेवेत चूक करणाऱ्यांना माफी नाही,' असा कडक इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी दिला आहे.
या गंभीर घटनेची पार्श्वभूमी अत्यंत क्लेशदायक आहे. पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाइकांना आधी तक्रार नोंदवण्यासाठी केज पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर संपूर्ण रात्र उपाशीपोटी घालवावी लागली होती. त्यानंतर २७ मे रोजी सकाळी ११ वाजता पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले असता, तिथेही तिला रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ९ तास प्रतीक्षा करावी लागली. या संवेदनशील प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. सोळंके आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल.आर. तांदळे यांनी रुग्णालयात धाव घेऊन चौकशी केली, ज्यामध्ये डॉ. पाटील दोषी आढळल्या. दरम्यान, केज पोलीस ठाण्याचे ठाणेदार स्वप्निल उनवणे यांच्या संशयास्पद भूमिकेवर आणि पोलिसांच्या एकूणच ढिसाळ कामगिरीवरही पीडितेच्या वडिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.

0 Comments