नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. सन २०२३ च्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत 'पेसा' (PESA) क्षेत्रातील २६ बआरोग्य सेवक (पुरुष) कर्मचाऱ्यांना आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.नमन गोयल (IAS) यांच्या हस्ते नियमित नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
पार्श्वभूमी: मानधनापासून नियमित वेतनश्रेणीपर्यंतचा प्रवास २०२३ मध्ये झालेली ही भरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क्र.२२१०९/२०२३ मुळे प्रलंबित होती. न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून या उमेदवारांना सुरुवातीला 'एकत्रित मानधन' तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली होती.
परंतु, ग्रामविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार आणि बिंदुनामावलीच्या तपासणीनंतर, या २६ कर्मचाऱ्यांना आता नियमित सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वेतनश्रेणी आणि लाभ
नवनियुक्त कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगाची एस-९ (₹२६,४०० - ₹८३,६००) ही वेतनश्रेणी लागू होणार असून, शासनाच्या नियमानुसार सर्व देय भत्ते देखील मिळणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.प्रशासकीय उपस्थिती नंदुरबार जिल्हा परिषदेत आयोजित या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यासह चंद्रकांत पवार (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी) रविंद्र सोनवणे (जिल्हा आरोग्य अधिकारी)
श्री.रघुनाथ भोये (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) आणि आरोग्य विभागातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.नमन गोयल (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनयावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी नवनियुक्त आरोग्य सेवकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "नंदुरबारसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आरोग्य सेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संवेदनशीलतेने आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख सेवा द्यावी."
नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी देखील जिल्हा परिषद प्रशासनाचे आणि विशेषतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

0 Comments