वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.१८) समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोल नाका (इंटरचेंज क्र.१९) येथे भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने परिसरात मोठी खळबळ उडाली.
शेतकऱ्यांना कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असून, त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले. पहिल्यांदाच समृद्धी महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेतले. यावेळी संतप्त शेतकरी व शिवसैनिकांनी पोलिसांची गाडी अडवत जोरदार घोषणाबाजी केली.
कांद्याला किमान २ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान जाहीर करावे, कांदा निर्यात खुली करावी तसेच कांदा चाळ उभारणीसाठी ७५ टक्के अनुदान द्यावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगांवकर, संजय पाटील निकम, मनोज गायके, अॅड. रमेश सावंत, युवासेना जिल्हा उपप्रमुख विठ्ठल पाटील डमाळे, दिनेश मुथा, राजू पाटील गलांडे यांच्यासह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी व शिवसैनिक सहभागी झाले होते. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

0 Comments