राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून मोठी ओढाताण सुरू झाली असून, बहुरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या 'तुतारी' चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने हा पेच निर्माण झाला आहे. जागावाटपात ही जागा शरद पवार गटाकडे असतानाही, बदललेल्या परिस्थितीमुळे आता काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही या जागेवर आपला दावा ठोकला आहे. या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी आणि पर्यायी उमेदवाराचा शोध घेण्यासाठी शरद पवार यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी, अहिल्यानगरमध्ये पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, खासदार नीलेश लंके आणि जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, ज्यात कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यावर भर देण्यात आला. महाविकास आघाडी एकसंध राहून निवडणूक लढवणार की मित्रपक्षांमधील ही रस्सीखेच मैत्रीपूर्ण लढतीकडे झुकणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments