( मो रुस्तम शेख )यवतमाळ प्रतिनिधी :
कळंब नगर पंचायतने आर्थिक वर्षाच्या अखेरीस मालमत्ता कराची तब्बल ९६ टक्के तर पाणी पट्टी कराची २५ टक्के वसुली ३१ मार्चपर्यंत पूर्ण करत एक आदर्श निर्माण केला आहे. कर वसुलीतील ही उल्लेखनीय कामगिरी प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीसह नागरिकांच्या सक्रिय सहकार्याचे द्योतक मानली जात आहे.
या यशाबद्दल नगर पंचायतच्या अध्यक्षा श्रीमती अफरोज बेगम फारूक सिद्दिकी, उपाध्यक्ष श्री. आकाश विनायकराव कुटेमाटे, तसेच सर्व सन्मानीय सभापती व सदस्य आणि मुख्याधिकारी श्री. येमाजी धुमाळ यांनी कळंब शहरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नगर पंचायतने ०१ नोव्हेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत “लक्की ड्रा स्पर्धा” हा अभिनव उपक्रम राबवला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे कर वसुलीत सकारात्मक वाढ झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सोडत काढण्यात आली. या सोडतीत २५ भाग्यवान विजेत्यांची निवड करून त्यांना आकर्षक गृहउपयोगी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
ही वसुली साध्य करण्यासाठी कार्यालय अधीक्षक व मालमत्ता कर वसुली प्रमुख दीपा चव्हाण तसेच स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता व पाणी पट्टी कर वसुली प्रमुख गौरव मांडळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम अभियंता प्रियंका फुकटे, लेखापाल निलेश गारुडी, अंतर्गत लेखापाल पवन डांगे, स्वच्छता निरीक्षक अंजू व्यास यांच्यासह नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम पार पाडले.
यामध्ये ज्योत्स्ना ठाकरे, नारायण रोहणे, पुनेश्वर चांदवे, गजानन येंडे, धीरज भोयर, अविन वेल्के, सुनील डकरे, शागीर खान, जयदेव केवटे, अमित मोहनापुरे, खुशाल ठाकरे, शुभम गटलेवार, रंजित हिवरे, प्रदीप मोहोड यांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही यशस्वी वसुली शक्य झाली.
नियोजनबद्ध धोरण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि नागरिकांचा विश्वास यांच्या बळावर कळंब नगर पंचायतने साधलेले हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

0 Comments