"धुळोबाच्या नावानं चांगभलं" च्या गजरात उत्साहात संपन्न
हातकणंगले (प्रतिनिधी) – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आळते (ता. हातकणंगले) येथील श्री क्षेत्र धुळोबा देवालयाची चैत्र यात्रा यंदाही अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. *"धुळोबाच्या नावानं चांगभलं"* च्या गजराने संपूर्ण डोंगर परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि सासनकाठ्यांच्या नृत्याने यात्रेला एक वेगळेच दैवी स्वरूप प्राप्त झाले होते.
सोमवारी अनुराधा नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर श्री धुळोबा देवाच्या पालखीची भव्य मंदिर प्रदक्षिणा काढण्यात आली. हजारो भाविकांनी “चांगभलं”च्या जयघोषात देवावर गुलाल-खोबरे उधळत भक्तीभाव व्यक्त केला. महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध भागांतून आलेल्या मानाच्या सासनकाठ्या हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. पालखी सोहळ्यानंतर पारंपरिक विधींनी यात्रेची सांगता करण्यात आली.
यात्रेनिमित्त श्री शिवतेज परिवार व यात्रा कमिटी (गुरव समाज) यांच्या वतीने भाविकांसाठी भव्य *मोफत अन्नछत्र* उभारण्यात आले होते तसेच पटेल समाजातर्फे कोकम सरबताचे वाटप करण्यात आले होते . श्री शिवतेज परिवार यांचे वतीने उन्हा-तान्हातून आलेल्या भाविकांसाठी सलग अविरत अशी २० वर्षांपासून मोफत अन्नछत्राची सेवा देण्यात येते. श्री शिवतेज परिवाराच्या राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल भाविकांमधून कौतुक होत होते. शिवतेज परिवार धुळोबा अन्नछत्राचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरणरावजी इंगवले, आळते लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले, उपसरपंच अमित पाटील, हातकणंगले पंचायत समितीचे नुतन उपसभापती संतोष कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश कांबळे, नेसरीचे धार्मिक गुरु हजरत सय्यद चांदबुखारी सय्यद सुलतान ( काद्री उस्ताद) या सर्वांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास हातकणंगले विधानसभचे आमदार अशोकराव माने(बापू), प्रसाद खोबरे यांनी सदिच्छा भेट दिली. या सेवाभावी उपक्रमांचे भाविकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
अन्नछत्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरणराव इंगवले, सरपंच अजिंक्य इंगवले, उपसरपंच अमित पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संतोष कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश कांबळे तसेच नेसरीचे धार्मिक गुरु हजरत सय्यद चांदबुखारी सय्यद सुलतान (काद्री उस्ताद) यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अशोकराव माने (बापू) व प्रसाद खोबरे यांनी सदिच्छा भेट देत यात्रेच्या आयोजनाचे कौतुक केले.
यात्रेचे आणखी एक आकर्षण म्हणजे श्री क्षेत्र कुंथुगिरी येथून आलेला हत्ती! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या हत्तीभोवती गर्दी करत आनंद लुटला.
भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त यामुळे यात्रा कोणतीही अडचण न येता सुरळीत पार पडली.
मात्र रस्त्यांची दयनीय अवस्था ठरली खटकणारी -
रामलिंग पायथा ते धुळोबा देवालय या मार्गाची अत्यंत खराब अवस्था भाविकांसाठी डोकेदुखी ठरली. खड्डेमय रस्ता, उडणारी धूळ आणि अपुरी दुरुस्ती यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. वारंवार निवेदने देऊनही संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना न झाल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
*"पुढील यात्रेपूर्वी तरी हा रस्ता सुस्थितीत येणार का?"* असा संतप्त सवाल भाविकांनी उपस्थित केला आहे.

0 Comments