Ticker

6/recent/ticker-posts

स्पर्श प्रणालीचा फटका; महागांव तालुक्यात १४ हजारांहून अधिक घरकुलांचे बांधकाम अर्धवट



प्रतिनिधी महागांव दीपक तायवाडे 

दैनिक लोक युवा 

हप्ते रखडल्याने लाभार्थी हवालदिल,स्वतःच्या घराचे स्वप्न अधांतरी

महागांव : ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःच्या घराचा हक्क मिळावा या उद्देशाने राबविण्यात येणारी पंतप्रधान आवास घरकुल योजना महागाव तालुक्यात सध्या अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. स्पर्श प्रणालीमुळे निधी वितरणाची प्रक्रिया रखडल्याने हजारो लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाला ब्रेक लागला असून अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत उभी राहिली आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महागांव तालुक्यात पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत १४ हजार ८०० पेक्षा अधिक पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार या योजनेत घरकुल बांधकामासाठी टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जातो. त्यानुसार पहिला हप्ता म्हणून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १५ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला. या निधीच्या आधारावर अनेक लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम सुरू केले.

काहींनी घराचा पाया टाकला, काहींनी भिंती उभारण्याचे काम सुरू केले, तर काहींनी छप्पर टाकण्याच्या तयारीत पाऊल टाकले. मात्र त्यानंतर मिळणारे दुसरे, तिसरे आणि चौथे हप्ते वेळेत न मिळाल्याने अनेकांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबले आहे. परिणामी तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची अपूर्ण बांधकामे उघडी पडलेली दिसत असून लाभार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी घरकुल मंजूर झाल्याच्या आनंदात स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून काम सुरू केले. काहींनी नातेवाईकांकडून उसनवारी केली, तर काहींनी कर्ज काढून बांधकाम पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढील हप्ते न मिळाल्याने त्यांचे सर्व गणित बिघडले असून अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घरकुल योजनेच्या निधी वितरणासाठी सध्या स्पर्श प्रणालीचा वापर केला जात आहे. परंतु या प्रणालीमुळे निधी वेळेत मिळत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून वारंवार पुढे येत आहे. तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे निधी वितरणात विलंब होत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, १ मे रोजी मोठ्या प्रमाणावर घरकुल लाभार्थ्यांचा गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. मात्र महागाव तालुक्यातील अनेक घरांची कामे अद्याप अर्धवट असल्याने हा कार्यक्रम प्रत्यक्षात कितपत यशस्वी होणार, असा सवाल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

“घरकुल मंजूर झाले म्हणून आम्ही आनंदाने काम सुरू केले. पण पुढील हप्ते वेळेत मिळत नसल्यामुळे घर पूर्ण करणे कठीण झाले आहे,” अशी व्यथा काही लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

सध्या १४ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थी पुढील निधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन निधी वितरणाची प्रक्रिया गतीमान करावी, अडकलेले हप्ते त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत आणि घरकुल बांधकामाला गती द्यावी, अशी मागणी तालुक्यातील लाभार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे.

ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न या योजनेवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन घरकुल बांधकामाला गती दिली तरच लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल आणि आगामी गृहप्रवेश कार्यक्रमालाही खऱ्या अर्थाने यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments