पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याची शक्यता
नांदेड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सोमवार, ४ मार्च रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील यांनी संवाद दौरा आयोजित केला असून ३ मार्च रोजी ते बीड, धाराशिव तर ४ मार्च रोजी दुपारपर्यंत सोलापूरवरून सायंकाळी नांदेड शहरात दाखल होणार आहेत.
मराठा आरक्षणाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी ते नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांसोबत 'संवाद बैठक घेणार आहेत. सदरील बैठकीत ते समाजाला मार्गदर्शनपर संवाद साधण्यासाठी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास चांदोजी पावडे मंगल कार्यालय, कॅनल रोड नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी ते देशमुख परिवाराच्या विवाह सोहळ्यास अर्धापूर रोडवरील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय येथे हजेरी लावणार आहेत. लग्न समारंभात हजेरी लावल्यानंतर ते सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आणि गावागावांतील गरजवंत मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वीही जरांगे पाटील हे नांदेडात आले असताना त्यांचे जंगी स्वागत केले होते.

0 Comments