चाकूर तालुक्यात अपघात; एकजण गंभीर

चाकूर (जि. लातूर) : नांदेड येथून तुळजापूरकडे जाणारी कार रस्त्याकडेला ऊस भरुन थांबलेल्या ट्रक्टर ट्रेलरवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात नांदेड येथील चारजण ठार झाले. एकजण गंभीर जखमी असून त्यास लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रविवारी (दि. ३) पहाटे साडेतीनच्या सुमारास चाकूर तालुक्यातील आष्टामोडनजीक नांदेड ते लातूर महामार्गावर हा अपघात झाला. 

याप्रकरणी चाकूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नांदेड येथून कार (क्र. एमएच २६/बी.सी.८२८६) ने रविवारी पहाटे तुळजापूरकडे पाचजण जात होते. पहाटे राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड ते महाळंग्रा दरम्यान ऊस वाहतूक करणारे ट्रेलर ऊस भरुन उभे होते. या विना नंबरच्या व रेडियम नसलेल्या ट्रेलरवर कार आदळून दोघे जागीच ठार झाले तर रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेल्यानंतर आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आणखी एकजण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलिसांकडून समजले. कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६, रा. किल्लारोड नांदेड), मोनु बालाजी कोतवाल (वय २७), नरमण राजाराम कात्रे (वय ३३), कृष्णा यादव (रा. नांदेड) यांचा मृत्यू झाला तर शुभम किशोर लंकाढाई (रा. नांदेड) हा गंभीर जखमी आहे.

पाचजण तुळजापूर येथे देवदर्शन व कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भयंकर होता की, कारचे सुद्धा तुकडे- तुकडे झाल्याचे दिसून आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाकूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, उपनिरीक्षक राजेश घाडगे, बीट अंमलदार भागवत मामडगे, शिरीषकुमार नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयताच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली