दैनिक लोकयुवा प्रतिनिधी : प्रतीक वाढई
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नागपूर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात नागपूर जिल्ह्याने महाराष्ट्रात आघाडी कायम ठेवली आहे.
८ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात तब्बल १ लाख २८ हजार २२६ सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता ४६५ मेगावॅट असून, लाभार्थ्यांना सुमारे ८९७ कोटी रुपयांचे अनुदान मिळाल्याची नोंद आहे.
वीजबिलाच्या वाढत्या खर्चातून दिलासा मिळावा, या उद्देशाने नागरिक सौरऊर्जेकडे वळत आहेत. या योजनेमुळे घरगुती पातळीवर वीज निर्मिती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र घरगुती ग्राहकांना प्रकल्पाच्या क्षमतेनुसार केंद्र सरकारकडून ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.
नागपूर जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागातही सौरऊर्जेबाबत जागरूकता वाढत असून, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.

0 Comments