प्रशासक राजेंद्र कानडे व निरीक्षक बाळासाहेब गंगावणे यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचा शुभारंभ
तेर | प्रतिनिधी
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी संत शिरोमणी श्री संत गोरोबाकाकांच्या पालखीचे उद्या, ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी तेर येथील समाधी मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. श्री संत गोरोबाकाका व शिव मंदिर समितीचे प्रशासक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त राजेंद्र कानडे आणि मंदिर समितीचे निरीक्षक बाळासाहेब गंगावणे यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.
पालखी सोहळ्याचा प्रवास पुढीलप्रमाणे असणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी हिंगळजवाडी, १२ नोव्हेंबर रोजी वरुडा, १३ नोव्हेंबर रोजी धाराशिव शहर, १४ नोव्हेंबर रोजी भातंबरे, १५ नोव्हेंबर रोजी वैराग, १६ नोव्हेंबर रोजी यावली, १७ नोव्हेंबर रोजी खैराव, १८ नोव्हेंबर रोजी अनगर आणि १९ नोव्हेंबर रोजी रोपळे येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.
२० नोव्हेंबर रोजी पहाटे संत गोरोबाकाकांची पालखी पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या तीरावर दाखल होणार आहे. चंद्रभागा नदीमध्ये स्नान केल्यानंतर पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करणार असून, कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होणार आहे.
या पालखी सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविक भक्तांनी व नागरिकांनी मंदिर प्रशासनाकडे नोंदणी करून ओळखपत्र घ्यावे, असे आवाहन संत गोरोबाकाका व शिव मंदिर समितीचे प्रशासक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त राजेंद्र कानडे, निरीक्षक बाळासाहेब गंगावणे, व्यवस्थापक राजाभाऊ आंधळे आणि साहेबराव सौदागर यांनी केले आहे.

0 Comments