लोकसहभागातून दहिसर तर्फे तारापूर येथे वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी! कृषी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन; शेतकरी आशिष कुमार पंडित यांच्याकडून गोण्या मोफत उपलब्ध करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन
दैनिक लोकयुवा पालघर जिल्हा प्रतिनिधी – केविल पाटील
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासोबतच भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने पालघर तालुक्यातील दहिसर तर्फे तारापूर येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली. ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, शेजारील नांदगाव तर्फे तारापूर येथील प्रयोगशील शेतकरी श्री. आशिष कुमार पंडित यांनी बंधाऱ्यासाठी आवश्यक रिकाम्या गोण्या विनामूल्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
पावसाळ्यात ओढ्या-नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक निचरा होण्यास मदत करणे, हा वनराई बंधारा उभारण्यामागील प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. योगेश साळुंके यांनी ग्रामस्थांना वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच बंधाऱ्याची उभारणी कशा पद्धतीने करावी, याबाबत आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.
बंधाऱ्याच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात रिकाम्या गोण्यांची आवश्यकता होती. ही गरज ओळखून नांदगाव तर्फे तारापूर येथील शेतकरी श्री. आशिष कुमार पंडित यांनी तत्परतेने पुढाकार घेत आवश्यक गोण्या कोणताही मोबदला न घेता उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या सहकार्यामुळे बंधाऱ्याच्या उभारणीच्या कामाला गती मिळाली आणि हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
या उपक्रमासाठी दहिसर तर्फे तारापूरच्या सरपंच सौ. अमृता धोदडे आणि ग्रामसेविका सौ. रीना म्हात्रे यांनी विशेष पुढाकार घेतला. ग्रामपंचायत, कृषी विभाग, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा जलसंधारणाचा उपक्रम पूर्णत्वास गेला.
लोकसहभागातून जलसंधारणाचा आदर्श!
पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविणे ही काळाची गरज बनली आहे. शासकीय मार्गदर्शन, ग्रामपंचायतीचा पुढाकार आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यांच्या माध्यमातून साकारलेला हा वनराई बंधारा परिसरातील जलसंधारणासाठी उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमासाठी मार्गदर्शन करणारे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. योगेश साळुंके, विनामूल्य गोण्या उपलब्ध करून देणारे शेतकरी श्री. आशिष कुमार पंडित तसेच सहभागी ग्रामस्थांचे दहिसर ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

0 Comments